YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 1:1-7

विलापगीत 1:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे. ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत. दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे. सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. तिच्या कुमारी दु:खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत. तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत. सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे. तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले आहेत, आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत. यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.

सामायिक करा
विलापगीत 1 वाचा

विलापगीत 1:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, आता कशी निर्जन झाली आहे! एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी आता कशी दासी झाली आहे. रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत. पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे. सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक कण्हत आहेत, तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, आणि तिला अत्यंत पीडा होत आहे. तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत. सीयोनकन्येचे सर्व वैभव लुप्त झाले आहे. तिचे राजपुत्र ज्यांना चरण्याकरिता कुरण उपलब्ध नाही अशा हरिणासारखे झाले आहेत; सामर्थ्यहीन होऊन ते त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांपासून त्यांनी पलायन केले आहे. यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.

सामायिक करा
विलापगीत 1 वाचा

विलापगीत 1:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे! ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत. यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्‍या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे. पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे. तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत. सीयोनकन्येचे सर्व तेज गेले आहे; तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत; ते पाठलाग करणार्‍यापुढून हतबल होऊन पळाले आहेत. यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.

सामायिक करा
विलापगीत 1 वाचा