यहूदा 1:8-11
यहूदा 1:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात. परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्याऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला. परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे, नैसर्गिकरीत्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.
यहूदा 1:8-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगदी त्याचप्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राण्यांची निंदा करतात. परंतु प्रमुख देवदूत मीखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरुन सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याची निंदा करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!” तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात, आणि ज्या गोष्टी त्यांना अविवेकी प्राण्यांप्रमाणे उपजत स्वभावाने समजतात त्यायोगे ते नाश करून घेतात. त्यांना धिक्कार असो! त्यांनी काइनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.
यहूदा 1:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात. आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.
यहूदा 1:8-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात. आद्य देवदूत मीखाएलदेखील असा वागला नाही. जेव्हा त्याने मोशेच्या शरीराविषयी सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याचा उपमर्द करण्यास तो धजला नाही, तर ‘प्रभू तुझी कानउघाडणी करो’, एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.