YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहूदा 1:5-16

यहूदा 1:5-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहीती आहे तरी मी तुम्हास हे आठवून घावे अशी माझी इच्छा आहे की, परमेश्वराने त्या लोकांस मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले; आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात. परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्याऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला. परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टींविषयी वाईट बोलतात. पण त्यांना निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे, नैसर्गिकरीत्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत. हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत, ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत, ते वार्‍यांबरोबर निघून जाणारे निर्जल ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मरण पावलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत, ते समुद्रावरच्या विक्राळ लाटांसारखे स्वतःची लाज फेसाप्रमाणे वर आणतात. ज्यांच्याकरता, सर्वकाळसाठी निबीड अंधार राखून ठेवलेला आहे असे भटके तारे ते आहेत. आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की, “बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला. तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांस, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुध्द त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.” ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनांप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते फुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा

यहूदा 1:5-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा त्यांनी नाश केला. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात. परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!” तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील. त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला. हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत. ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे. आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत सर्वांचा न्याय करण्यासाठी आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतीमध्ये केली आणि अनीतिमान पाप्यांनी त्यांच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.” हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे आहेत; वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची बढाई मारणारे आणि स्वतःच्या लाभासाठी इतरांची खुशामत करणारे आहेत.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा

यहूदा 1:5-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्हांला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे; ते हे की, प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले, आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला; आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले. त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत. तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात. आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत; ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे. आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1 ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा

यहूदा 1:5-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रभूने इजिप्त देशातून आपल्या लोकांना मुक्त केले परंतु नंतर जे विश्वासहीन झाले, त्यांचा त्याने नाश केला, हे तुम्हांला ठाऊक आहेच. तरीही मी तुम्हांला त्याची आठवण करून देऊ इच्छितो. ज्या देवदूतांनी आपल्या अधिकारपदाची मर्यादा न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे. सदोम, गमोरा आणि सभोवतालची नगरे येथील लोक त्या देवदूतांसारखे वागले आणि त्यांनी विकृत, अनैतिक, लैंगिक वर्तन केले. सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली ही नगरे स्पष्ट इशारा म्हणून सर्वांच्या पुढे ठेवली आहेत. हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात. आद्य देवदूत मीखाएलदेखील असा वागला नाही. जेव्हा त्याने मोशेच्या शरीराविषयी सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याचा उपमर्द करण्यास तो धजला नाही, तर ‘प्रभू तुझी कानउघाडणी करो’, एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला. ते तुमच्याबरोबर निर्लज्ज मद्यपानोत्सव करतात, तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात घाणेरड्या स्थळांसारखे आहेत, ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेल्या निर्जल मेघांसारखे, हेमंत ऋतूतील फलहीन, पूर्णपणे मेलेल्या व समूळ उपटलेल्या झाडांसारखे आहेत. हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे. आदामपासून सहावा वंशज हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की, पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल. हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा