यहोशवा 7:1-10
यहोशवा 7:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला. बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले, नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.” म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले. यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले. मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते! हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?” तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
यहोशवा 7:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, “सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त दोन-तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत.” म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले. तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, “हायहाय! हे प्रभू परमेश्वरा, आम्हांला अमोर्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देनेपार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देनेपलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते! हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?” तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ऊठ, असा पालथा का पडलास?