यहोशवा 3:7-17
यहोशवा 3:7-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल. कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.” मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका! अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल. संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा; संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.” लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.) तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
यहोशवा 3:7-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे. कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ” मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका. यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील. पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल. तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा. याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.” जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले. तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले. सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.
यहोशवा 3:7-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोश वाहणार्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’ मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका.” यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल : अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे. तर आता इस्राएल वंशांतून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एकेक. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.” लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले; कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते); तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.