यहोशवा 2:1-7
यहोशवा 2:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, “पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.” पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले.
यहोशवा 2:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले. तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.” परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते. संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.” परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते. तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.
यहोशवा 2:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, “माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले; ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल.” पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली.