यहोशवा 14:6-15
यहोशवा 14:6-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, “कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा मनुष्य मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहीतच आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेश-बर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्यास कळवली. पण माझे बंधू जे माझ्याबरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो. तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले ती खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन अशी सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास. तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे. जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे. तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.” तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला. पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा मनुष्य होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.
यहोशवा 14:6-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरायला कादेश-बर्ण्याहून पाठवले तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की, ‘तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल.’ इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.” मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले, म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे; ह्याचे कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.