यहोशवा 1:1-6
यहोशवा 1:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला, “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा. मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही. बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
यहोशवा 1:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे. रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.