योएल 2:12-18
योएल 2:12-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.” आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा; वडिलांना जमवा; मुले व स्तनपान करणारी अर्भके ह्यांनाही एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’ तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.
योएल 2:12-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.” आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील? सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा. लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो. याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे? मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली.