ईयोब 9:15-35
ईयोब 9:15-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो. मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल. तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल. कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय? मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते. मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो. काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का? जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो? माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही. लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल. मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस. मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले. तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल. देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही. असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.”
ईयोब 9:15-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्याची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते; तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खातरी झाली नसती. कारण तो वादळाने माझा चुराडा करतो, विनाकारण मला घायावर घाय करतो. तो मला श्वासही घेऊ देत नाही, तो मला क्लेशाने व्यापून टाकतो. बलवान कोण? असा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील? मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरवील; मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरवील. मी निर्दोष आहे तरी माझे मला काही कळत नाही; माझा जीव मला नकोसा झाला आहे. हे कसेही असो, एकूण एकच; म्हणून मी म्हणतो, देव निर्दोष्याचा तसाच दुष्टाचाही नाश करतो. अकस्मात अरिष्ट येऊन संहार होत असता ते निर्दोष्याच्या संकटाला हसते. पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे, देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकतो; ही त्याची करणी नव्हे तर दुसर्या कोणाची? माझे दिवस जासुदाहून त्वरित जात आहेत; ते पळत आहेत, त्यांत काही कल्याण दिसत नाही. ते वेगवान तारवांसारखे,2 आपल्या भक्ष्यावर झडप घालणार्या गरुडासारखे निघून जात आहेत. विलाप करण्याचे मी विसरावे, मुखाची खिन्नता सोडून उल्लसित दिसावे, असे मी मनात आणले; तरी माझ्या ह्या सर्व दु:खांनी मी घाबरून जातो. तू मला निर्दोषी ठरवणार नाहीस हे मला ठाऊक आहे. मी दोषी ठरणारच; तर मग मी हा व्यर्थ खटाटोप का करू? माझे अंग बर्फाने धुतले, माझे हात खाराने स्वच्छ केले, तरी तू मला खाड्यात टाकशील, माझी वस्त्रेदेखील माझा धिक्कार करतील. मी त्याच्याशी वाद करावा, आम्ही एकमेकांत लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही. आम्हा दोघांवर हात ठेवील, असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही. तो माझ्यावरला सोटा दूर करो. त्याचा धाक मला घाबरे न करो. म्हणजे मी त्याच्याशी बोलेन, त्याला भिणार नाही, कारण मी आपणास तसा समजत नाही.”