ईयोब 42:1-7
ईयोब 42:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला: “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही. तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो. परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे. परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे. आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील. परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.
ईयोब 42:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ईयोब परमेश्वराला म्हणाला, “तुला सर्वकाही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. ह्यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. आता ऐक; मी बोलतो! मी तुला विचारतो, तू मला बोध कर, मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे; म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” परमेश्वराचे ईयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, “तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही.