YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 3:1-26

ईयोब 3:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. तो (ईयोब) म्हणाला, “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो. तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते. मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो, ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो. पाहा, ती रात्र फलीत न होवो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो. जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो. त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो. कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही. उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही? तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला? तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो. पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते. कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते. तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो. तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही. लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत. दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो? ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो? मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”

सामायिक करा
ईयोब 3 वाचा

ईयोब 3:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. तो म्हणाला: “माझा जन्मदिवस नष्ट होवो, आणि ‘पुत्र गर्भधारण झाले!’ असे ज्या रात्रीने म्हटले, तो दिवस अंधकार असा होवो; वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो; त्या दिवसावर प्रकाश न पडो. होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो; त्यावर ढग वास्तव्य करून राहो; काळोख त्यावर मात करो. त्या रात्रीला अंधकार जप्त करो; वर्षाच्या दिवसात त्याची गणती न होवो कोणत्याही महिन्यांमध्ये त्याची गणती न होवो. ती रात्र उजाड होवो; आणि आनंदाचा गजर त्यातून ऐकू न येवो. जे दिवसाला शाप देतात, जे लिव्याथानाला चेतविण्यास तयार असतात, ते त्याला शापित करोत. त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत; दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो, कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत आणि दुःखाला माझ्या डोळ्याआड केले नाही. “मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही? गर्भाशयातून निघताच माझे प्राण का गेले नाहीत? माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या आणि मला दुग्धपान करावे म्हणून स्तन का तयार होते? कारण मी तर आता शांतपणे पडून निजलेला असतो; मी झोपेत विश्रांती पावलेला असतो. पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी, ज्यांनी स्वतःसाठी वाडे बांधले ते आता ओसाड पडले आहेत, ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते, ज्यांनी आपली घरे रुप्यांनी भरली. अकाली पतन पावलेल्या गर्भासारखे, दिवसाचा प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखे मला जमिनीत गाडून का ठेवले नाही? कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात, आणि थकलेले लोक विसावा पावतात. तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात, कारण तिथे गुलामाच्या अधिकार्‍याचे ओरडणे ऐकू येत नाही. लहान आणि मोठे तिथे असतात, आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात. “जे कष्टात आहेत त्यांना प्रकाश, आणि जे आत्म्यात कडू आहेत त्यांना जीवन का द्यावे, ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही, गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात, जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, आणि उल्हास पावतात. ज्याचा मार्ग गुपित आहे, ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे अशा मनुष्याला जीवन का दिले आहे? उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे; माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे. ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे; जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे. मला शांती नाही, स्वस्थता नाही; मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.”

सामायिक करा
ईयोब 3 वाचा

ईयोब 3:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर ईयोबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. ईयोब म्हणाला, “मी जन्मलो तो दिवस जळो! ‘पुरुषगर्भ राहिला’ असे जी रात्र म्हणाली ती जळो! तो दिवस अंधार होवो; ईश्वर त्या दिवसाची निगा न करो; त्यावर प्रकाश न पडो. अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो. काय ती रात्र! काळोख तिला पछाडो! वर्षाच्या दिनमालिकेत ती आनंद न करो; महिन्याच्या तिथीत तिची गणना न होवो. पाहा! ती रात्र निष्फळ असो; तिच्यात आनंदघोषाचा प्रवेश न होवो. दिवसाला शाप देणारे, लिव्याथानाला1 चेतवण्यात निपुण असणारे तिला शाप देवोत. तिच्या प्रभातसमयीचे तारे अंधकारमय होवोत; ती प्रकाशाची अपेक्षा करो, पण तिला तो न मिळो, तिला उषानेत्रांचे दर्शन न घडो; कारण तिने माझ्या मातेचे गर्भाशयद्वार बंद केले नाही, दुःख माझ्या डोळ्यांआड ठेवले नाही. मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला? मांड्यांनी माझा स्वीकार का केला? मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला? केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो, मी निजलो असतो, मी विसावा पावलो असतो; आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती व मंत्री ह्यांच्याबरोबर, सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार ह्यांच्याबरोबर मी विसावा पावलो असतो. अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो. तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवतात, श्रांत विश्रांती पावतात. तेथे बंदिवान एकत्र निश्‍चिंत राहतात; वेठीस लावणार्‍याचा शब्द त्यांच्या कानी पडत नाही. तेथे लहानथोर समान असतात; दास आपल्या धन्यापासून मोकळा असतो. विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते? ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही; गुप्त निधीसाठी खणणार्‍यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात; त्यांना शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो. ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडले आहे अशाला प्रकाश का प्राप्त होतो? मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. मी निश्‍चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरीदेखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत.”

सामायिक करा
ईयोब 3 वाचा