ईयोब 19:1-12
ईयोब 19:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, “तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात? तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही जर खरच मी काही चुक केली असेल तर, ती चुक माझी मला आहे. तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता. मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे. ‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही. मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे. देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत. त्याचा क्रोध मला जाळीत आहे, तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो. त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
ईयोब 19:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ईयोबाने प्रत्युत्तर केले, “तुम्ही कोठवर माझ्या जिवाला दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार? एवढ्यात दहा वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली; तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता ह्याची तुम्हांला लाज कशी वाटत नाही? मी काही चूक केलीच असली, तर ती माझी मला. तुम्ही माझ्यावर खरोखर तोरा मिरवणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार, तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे; त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे. मी ‘जुलूम! जुलूम!’ असे ओरडतो पण कोणी ऐकत नाही; मी दाद मागतो पण मला न्याय मिळत नाही. त्याने माझा रस्ता अडवला आहे. मला पुढे जाता येत नाही; त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे; त्याने माझे वैभव हरण केले आहे; माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढला आहे त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे; त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे. त्याने माझ्यावर आपला कोप भडकवला आहे; तो मला आपल्या शत्रूंत गणत आहे. त्यांच्या फौजा जमून माझ्यावर मोर्चा लावत आहेत; त्यांनी माझ्या डेर्याभोवती तळ दिला आहे.