योहान 7:25-44
योहान 7:25-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यावरुन यरूशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्यांना कळले आहे काय? तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.” यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही. मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?” लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले. यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.” यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय? हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ हे म्हणणे काय आहे?” मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते. लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.” कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?” यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली. त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत.
योहान 7:25-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यरुशलेममध्ये राहणारे काही लोक आपआपसात विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय? हा तर, येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्यांना खात्री पटली आहे का? परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपणास माहीत आहे; जेव्हा ख्रिस्त येईल, तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाही कळणार नाही.” हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कोठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही, पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.” त्यांनी येशूंना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांच्यावर हात टाकू शकले नाही, कारण त्यांची वेळ अद्यापि आली नव्हती. तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसीहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करील काय?” जेव्हा परूश्यांनी लोकांची त्यांच्याबद्दल चाललेली कुजबुज ऐकली. तेव्हा त्यांनी आणि प्रमुख याजकांनी येशूंना अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. येशू त्यांना म्हणाले, “मी तुमच्याजवळ आणखी थोडा वेळ राहणार आहे, मग ज्याने मला पाठविले, त्यांच्याकडे परत जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जेथे असेन, तेथे तुम्हाला येता येणार नाही.” यहूदी पुढारी एकमेकांस विचारू लागले, “या माणसाचा कुठे जाण्याचा विचार आहे की तो आपणास सापडणार नाही? कदाचित हा आपले लोक जे ग्रीक लोकांमध्ये पांगलेले आहेत, त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी जात असेल काय? ‘तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जेथे असेन, तेथे तुम्हाला येता येणार नाही,’ असे तो बोलला याचा अर्थ तरी काय असावा?” मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तान्हेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पवित्र आत्मा, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला दिला जाणार होता. परंतु तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते. त्यांचे हे शब्द ऐकल्यावर, त्यांच्यातील काहीजण म्हणाले, “खरोखर हा मनुष्य संदेष्टा आहे.” इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.” पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय? शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जेथे दावीद राहिला तेथून ख्रिस्त येईल?” अशा रीतीने लोकसमुदायात येशूंमुळे फूट पडली. काहींना त्यांना पकडावेसे वाटले, परंतु कोणीही त्यांच्यावर हात टाकला नाही.
योहान 7:25-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघडउघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकार्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.” ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” ह्यावरून ते त्याला धरण्यास पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. तेव्हा लोकसमुदायातील बर्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?” लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.” ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय? ‘तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?” मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.) लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, “हा खरोखर तो संदेष्टा आहे.” कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय? ‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?” ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरायला पाहत होते. तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
योहान 7:25-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे ऐकून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला ते ठार मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? हा कुठला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला असेल हे कोणालाही माहीत असणार नाही.” नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही. मी मात्र त्याला ओळखतो कारण मी त्याच्याकडून आलो आहे व त्याने मला पाठवले आहे.” ह्यामुळे ते त्याला धरायला पाहत होते, तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. मात्र लोकसमुदायातील बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो अधिक चिन्हे करील काय?” लोकसमुदाय येशूविषयी अशी कुजबुज करीत आहे, हे परुश्यांच्या कानावर गेले म्हणून त्यांनी व मुख्य याजकांनी त्याला अटक करण्याकरता काही अधिकारी पाठवले. मग येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन व नंतर ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाईन. तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय? ‘तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?” सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील.” त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता. लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणाले, “खरोखर हाच तो संदेष्टा आहे.” इतर म्हणत होते, “हा ख्रिस्त आहे”, परंतु आणखी काही म्हणाले, “ख्रिस्त गालीलमधून येणार आहे का? दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलहेममध्ये दावीद राहत होता. त्या नगरातून ख्रिस्त येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय?” ह्यामुळे त्याच्यावरून लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील काही लोक त्याला अटक करू पाहत होते तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.