योहान 6:41-51
योहान 6:41-51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले. पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
योहान 6:41-51 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका, ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो. जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले. परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही. मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”
योहान 6:41-51 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
योहान 6:41-51 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, मात्र जो देवाकडचा आहे त्याने पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला ठामपणे सांगतो, जो विश्वास ठेवतो, त्याला शाश्वत जीवन मिळते. मी स्वतः जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला परंतु ते मरण पावले. मात्र स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली, तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी स्वतः आहे, ही भाकर जो कोणी खाईल, तो सर्व काळ जगेल, जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”