योहान 6:16-24
योहान 6:16-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले, आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले; परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढ्यात त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनार्यास लागला. दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले.
योहान 6:16-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले; आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते. मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले. दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरी लहान तारवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधीत ते कफर्णहूमला आले.
योहान 6:16-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले, ते मचव्यात बसले आणि सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यापि त्यांच्याकडे परतले नव्हते. परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या. ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. परंतु ते त्यांना म्हणाले, “मी आहे; भिऊ नका.” ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जेथे त्यांना जायचे होते तेथे किनार्यास पोहोचली. मग दुसर्या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्यावर लोकांचा समुदाय थांबला होता तेथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहीत त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते. काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभुने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्याठिकाणी आल्या. समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तेथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
योहान 6:16-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य सरोवराकडे गेले. ते मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे कफर्णहूमला जाऊ लागले. अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. जोरदार वारा सुटून सरोवराचे पाणी खवळू लागले. मचवा सुमारे पाच-सहा किलोमीटर वल्हवून नेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून मचव्यापर्यंत चालत येताना पाहिले आणि त्यांचा थरकाप उडाला. तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” त्यांनी आपणहून त्याला मचव्यात घेण्याची इच्छा दर्शवली. परंतु त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा लवकरच किनाऱ्याला लागला. दुसऱ्या दिवशी, सरोवराच्या दुसऱ्या बाजूला जमलेल्या लोकांच्या लक्षात आले की, ज्या मचव्यात त्याचे शिष्य चढले होते त्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता. येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात चढला नव्हता, तर त्याचे शिष्य एकटे निघून गेले होते. जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत, असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्या लहान मचव्यांत बसून येशूचा शोध घेत कफर्णहूमला आले.