YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:43-54

योहान 4:43-54 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्या दोन दिवसानंतर, तो तेथून गालील प्रांतात निघून गेला. कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. म्हणून तो गालील प्रांतात आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले; कारण त्याने सणात यरूशलेम शहरात केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या; कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता. त्यावर येशू त्यास म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.” तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.” येशू त्यास म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.” तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.” यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:43-54 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले. कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. ते गालीलात आले, तेव्हा गालिलकरांनी त्यांचे स्वागत केले. कारण वल्हांडण सणाच्या वेळी, ते तेथे उपस्थित होते व यरुशलेममध्ये जे काही येशूंनी केले ते त्यांनी पाहिले होते. गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तेथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता. येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता. तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.” तो शासकीय अधिकारी म्हणाला, “महाराज, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.” त्या मनुष्याने येशूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि निघाला. तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली. मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.” तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याचे सर्व घराणे यांनी येशूंवर विश्वास ठेवला. येशूंनी यहूदीयातून गालीलात आल्यानंतर हे दुसरे चिन्ह केले होते.

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:43-54 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्या दोन दिवसांनंतर तो तेथून गालीलात निघून गेला. कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, ‘संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.’ म्हणून तो गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.” तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.” ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.” ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहूदीयातून गालीलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:43-54 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू तेथून गालीलमध्ये निघून गेला. कारण येशूने स्वतः ठामपणे म्हटले होते, “संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.” तो गालीलमध्ये आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले. यरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते, ते सर्व त्यांनी पाहिले होते कारण तेदेखील सणाला गेले होते. नंतर तो गालीलमध्ये काना येथे पुन्हा आला. ह्याच गावी त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी एक अधिकारी होता, त्याचा मुलगा कफर्णहूम या ठिकाणी आजारी होता. येशू यहुदियातून गालीलमध्ये आला आहे, हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, “आपण येऊन मरणास टेकलेल्या माझ्या मुलाला बरे करावे.” येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुत गोष्टी पाहिल्यावाचून विश्वास ठेवणार नाही. तो अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभो, माझा मुलगा मरण्यापूर्वी माझ्याबरोबर येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे!” तो मनुष्य येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून निघून गेला. तो घरी जात असता, त्याचे दास त्याला वाटेत भेटून म्हणाले, “तुमचा मुलगा वाचला आहे.” त्याला कोणत्या घटकेला उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल दुपारी एक वाजता त्याचा ताप उतरला.” ह्यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा वाचला आहे’, त्याच वेळी हे झाले, हे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने येशूवर विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालीलमध्ये आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होते.

सामायिक करा
योहान 4 वाचा