योहान 21:4-17
योहान 21:4-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.” आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते. तेव्हा ते किनार्यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.” तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही. तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली. येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ. मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
योहान 21:4-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही. येशूंनी हाक मारून विचारले, “मित्रांनो, तुमच्याजवळ काही मासे आहेत काय?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले. मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले. मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे नव्वद मीटर अंतरावर होते. मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते. येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते. मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले. मेलेल्यातून उठल्यावर शिष्यांना प्रगट होण्याची येशूंची ही तिसरी वेळ होती. जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?” तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे.” येशूंनी त्याला म्हटले, “तर माझ्या कोकरांना चार.” येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?” पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.” तिसर्या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार.
योहान 21:4-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडेल; म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, (कारण ते किनार्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते). मग किनार्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले; तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली; तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसर्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसर्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.
योहान 21:4-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते. येशूने त्यांना विचारले, “मुलांनो, तुमच्याकडे मासे नाहीत काय?” त्यांनी “नाही” असे त्याला उत्तर दिले. त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडतील”, त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी तसेच काही भाकरी पाहिल्या. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते. असे असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तो प्रभू आहे, असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात, हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकरी घेतल्या व त्यांना दिल्या, तसेच मासेही दिले. येशू मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्याने दर्शन दिल्याची ही तिसरी वेळ होती. त्यांनी न्याहरी केल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानच्या मुला शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.”