YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 21:15-25

योहान 21:15-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” “मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:15-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेवल्यानंतर, येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?” तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे.” येशूंनी त्याला म्हटले, “तर माझ्या कोकरांना चार.” येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?” पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.” तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभुजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार. मी तुला निश्चित सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा पोशाख चढवून तुला हवे तेथे जात होतास; परंतु तू जेव्हा वृद्ध होशील, तेव्हा तू आपले हात पसरशील आणि मग दुसरे तुला पोशाख घालतील आणि तुला जेथे जावयास नको तेथे नेतील.” परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू हे असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!” मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभुजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता. पेत्राने त्याला पाहिल्यावर येशूंना विचारले, “प्रभुजी, याचे काय?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.” या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्‍यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते की, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?” तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:15-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार. मी तुला खचीत खचीत सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वत: कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास; परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल.” तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला; आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे?” असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” ह्यावरून तो शिष्य मरणार नाही ही गोष्ट बंधुवर्गामध्ये पसरली; तरी ‘तो मरणार नाही’ असे येशूने त्याला म्हटले नव्हते; तर “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” असे म्हटले होते. जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहीत आहे. येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:15-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यांनी न्याहरी केल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानच्या मुला शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.” मी तुला खातरीपूर्वक सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमरपट्टा बांधून तुझी इच्छा असेल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील, तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझा कमरपट्टा बांधून तुझी इच्छा नसेल, तेथे तुला नेईल.” तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील, हे सुचवण्याकरता तो हे बोलला, आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” पेत्र मागे वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला त्याने मागे येताना पाहिले. भोजनाच्या वेळेस जो त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, ‘प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभो, ह्याचे काय?” येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली, तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” ह्यावरून तो शिष्य मरणार नाही, असा समज बंधुवर्गामध्ये पसरला. तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, पण ‘मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय’, असे म्हटले होते. जो ह्या घटनांविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. हे आम्हांला माहीत आहे. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व लिहून ठेवली तर त्यांची पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.

सामायिक करा
योहान 21 वाचा