योहान 20:13-18
योहान 20:13-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी) येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.” मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले.
योहान 20:13-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.” असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही. येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.” येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.” येशू म्हणाले, “मला स्पर्श करू नको, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ” मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभूला पाहिले आहे!” ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.
योहान 20:13-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये!” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे गुरूजी!) येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” मरीया मग्दालीया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.
योहान 20:13-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी तिला विचारले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले ते मला ठाऊक नाही!” असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे, हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे, असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस, तर त्याला कुठे ठेवलेस, हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरिये!” ती वळून त्याला म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे हिब्रू भाषेत गुरुवर्य) येशूने तिला म्हटले, “मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जात आहे.” मरिया मग्दालिया गेली व तिने प्रभूला पाहिल्याचे व त्याने तिला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.