योहान 20:11-31
योहान 20:11-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये!” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे गुरूजी!) येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” मरीया मग्दालीया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” येशू आला तेव्हा बारा जणांतील एक म्हणजे दिदुम1 म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसर्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.” मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.” थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!” येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.” ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.
योहान 20:11-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी) येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.” मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही.” आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!” येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!” आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.
योहान 20:11-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले. आणि तिला, जेथे येशूंचे शरीर ठेवले होते तेथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले. त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभुला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कोठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.” असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही. येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर त्याला तुम्ही कोठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.” येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरेमिक, भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.” येशू म्हणाले, “मला अडवू नकोस, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ” मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभुला पाहिले आहे!” ज्या गोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या. आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असताना, व यहूदी पुढार्यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभुला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला. पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.” आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्मा स्वीकारा. तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल; पण जर तुम्ही क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.” येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तेथे शिष्यांबरोबर नव्हता. इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभुला पाहिले!” परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जेथे खिळे ठोकले होते तेथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.” एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना, थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.” थोमाने म्हटले, “माझा प्रभू व माझा परमेश्वर!” मग येशूंनी त्याला म्हटले, “कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य होत.” येशूंनी अनेक चिन्हे आपल्या शिष्यांदेखत केली, ती या पुस्तकात कथन केलेली नाहीत. परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे, व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.
योहान 20:11-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इकडे मरिया कबरीजवळ रडत उभी राहिली होती. रडतारडता तिने वाकून कबरीत पाहिले. जेथे येशूचे शरीर ठेवले होते, तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व दुसरा पायथ्याशी बसलेले तिला दिसले. त्यांनी तिला विचारले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले ते मला ठाऊक नाही!” असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे, हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे, असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस, तर त्याला कुठे ठेवलेस, हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरिये!” ती वळून त्याला म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे हिब्रू भाषेत गुरुवर्य) येशूने तिला म्हटले, “मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जात आहे.” मरिया मग्दालिया गेली व तिने प्रभूला पाहिल्याचे व त्याने तिला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. त्याच दिवशी, म्हणजे रविवारी संध्याकाळी, यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून एकत्र जमलेल्या त्याच्या शिष्यांमध्ये येशू आला व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!” असे बोलून त्याने त्याचे हात व त्याची कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल आणि ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करणार नाही त्यांची क्षमा केली जाणार नाही.” येशू आला तेव्हा बारा जणांतील एक ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांतील व्रण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी माझे बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत माझा हात घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.” मग एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा खोलीत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!” नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन राहू नकोस तर विश्वास ठेवणारा हो.” थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!” येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवतात ते धन्य!” ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.