YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 2:1-10

योहान 2:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते; त्यांत दोन-दोन, तीन-तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा,” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्‍याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले, (तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणार्‍या चाकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

सामायिक करा
योहान 2 वाचा

योहान 2:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर तिसर्‍या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.” येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”

सामायिक करा
योहान 2 वाचा

योहान 2:1-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तेथे होती, येशू व त्यांचे शिष्य यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.” येशू म्हणाले, “बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजून तरी आलेली नाही.” त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.” त्याठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावत असे. येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपुर भरले. नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातले काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” त्यांनी तसे केले, त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कोठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले, “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”

सामायिक करा
योहान 2 वाचा

योहान 2:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. तेथे द्राक्षारस संपला असता येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई नोकरांना म्हणाली, “तो तुम्हांला जे काही सांगेल ते करा.” यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण ठेवलेले होते. त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावेल इतके ते मोठे होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले. नंतर त्याने त्यांना सांगितले, “आता थोडे काढून भोजन-कारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले ते पाणी भोजन- कारभाऱ्याने जेव्हा चाखले (तो द्राक्षारस कुठला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या नोकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजन-कारभारी वराला बोलावून म्हणाला, “प्रत्येक मनुष्य प्रथम उत्तम दर्जाचा द्राक्षारस वाढतो आणि लोक द्राक्षारस यथेच्छ प्याले म्हणजे नंतर साधारण दर्जाचा वाढतो. तू तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

सामायिक करा
योहान 2 वाचा