YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 19:1-25

योहान 19:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला. आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या. म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो.” तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.” यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?” येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.” यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.” म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले. तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले. आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.” पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.” मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या. पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:1-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग पिलाताने येशूंना फटके मारविले. सैनिकांनी एक काट्यांचा मुगूट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला. ते त्यांच्याकडे वारंवार जाऊन म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर चापटा मारल्या. मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तेथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्या पुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.” येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!” येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!” परंतु पिलाताने उत्तर दिले, “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टिकोणातून पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही.” तेव्हा यहूदी अधिकार्‍यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.” हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला. आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कोठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही. पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?” तेव्हा येशू उत्तरले, “जर तुला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्याने मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.” तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या माणसाला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.” हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरेमिक भाषेत गब्बाथा म्हणतात, तेथे तो न्यायासनावर बसला तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला. परंतु लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.” सरतेशेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. मग आपला स्वतःचा क्रूस वाहवून, ते कवटी म्हटलेल्या जागी आले, ज्याला अरेमिक भाषेमध्ये गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एक एक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले. पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा अरेमिक, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता. मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.” तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.” सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता. ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: “ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात, आणि माझ्या अंगरख्यासाठी चिठ्ठ्या टाकतात.” म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले. क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया या उभ्या होत्या.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले; आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.” ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही.” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांला नियमशास्त्र आहे; आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलाताने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?” येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.” ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.” हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, “पाहा, तुमचा राजा!” ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.” मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसर्‍याला दुसर्‍या बाजूस आणि येशूला मध्ये, असे वधस्तंभावर खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती. तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर ‘मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले,’ असे लिहा.” पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.” शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एकेक वाटा असे चार वाटे केले; त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे;” हे ह्यासाठी झाले की, “त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या,” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:1-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर पिलातने येशूला नेले आणि फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला व त्याला जांभळा झगा घातला. ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. पिलातने पुन्हा बाहेर जाऊन लोकांना म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्यासमोर बाहेर आणतो.” काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला, पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक व मंदिराचे रक्षक त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन क्रुसावर खिळा कारण मला तो अपराधी वाटत नाही.” यहुदी लोकांनी त्याला उत्तर दिले, “आमच्या कायद्यानुसार ह्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी, कारण ह्याने स्वतः देवाचा पुत्र असल्याचा दावा केला आहे.” हे बोलणे ऐकून पिलात अधिकच घाबरला. पुन्हा सरकारवाड्यात जाऊन त्याने येशूला विचारले, “तू कुठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलातने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला क्रुसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय?” येशूने उत्तर दिले, “तुम्हांला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला तुमच्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक मोठे आहे.” पिलातने हे ऐकले, तेव्हा तो येशूला सोडवण्याची खटपट करत राहिला. परंतु लोकसमुदाय आरडाओरड करून म्हणाला, “आपण ह्याला सोडले, तर आपण कैसरचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसरला विरोध करतो!” हे शब्द ऐकून पिलातने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाच्या जागी तो न्यायासनावर बसला. हिब्रू भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. तो ओलांडण सणाच्या तयारीचा दिवस होता व दुपारची वेळ झाली होती. पिलात लोकांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” ते ओरडले, “त्याला ठार करा, ठार करा, त्याला क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला क्रुसावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरवाचून आमचा कोणी राजा नाही!” त्यानंतर पिलातने येशूला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. त्यांनी येशूला ताब्यात घेतले. तो त्याचा क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्रू भाषेत गोलगोथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले. ‘नासरेथकर येशू, यहुदी लोकांचा राजा’, असे एका पाटीवर लिहून ती पिलातने क्रुसावर लावली. येशूला क्रुसावर खिळले ते स्थळ शहराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली. ती हिब्रू, लॅटिन व ग्रीक ह्या भाषांत लिहिली होती. मुख्य याजक पिलातला म्हणाले, “‘यहुदी लोकांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुदी लोकांचा राजा आहे, असे त्याने म्हटले’, असे लिहा.” पिलातने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.” शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल ते चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर चिठ्या टाकल्या’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या.

सामायिक करा
योहान 19 वाचा