योहान 14:1-31
योहान 14:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.” थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.” फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.” येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल. त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.” यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे. मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये, ‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे, यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”
योहान 14:1-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का? आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तेथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.” थोमा त्यांना म्हणाला, “प्रभुजी, आपण कोठे जात आहात, हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.” फिलिप्प म्हणाला, “प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.” येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करील, कारण मी पित्याकडे जात आहे. आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करीन. “जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील— सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे, व तुम्ही मजमध्ये आहात, व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझा पिताही प्रीती करील आणि मी देखील त्याजवर प्रीती करीन व स्वतः त्यांना प्रकट होईन.” नंतर यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभुजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?” येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझा पितादेखील त्यांच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू. जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत. “मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे. परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका. “मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता मजपेक्षा थोर आहे. आता हे घडून येण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे, यासाठी की ते घडून आले म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवावा. आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याची मजवर कसलीही सत्ता नाही, परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच तंतोतंत करतो. “आता उठा; आपण येथून जाऊ.”
योहान 14:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.” यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वत: आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल. मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही; परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.
योहान 14:1-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. असे जर नसते तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे म्हणून मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हांला माझ्याजवळ नेईन. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे, हे ज्याअर्थी आता तुम्ही ओळखले आहे, त्याअर्थी तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखाल आणि आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” फिलिप त्याला म्हणाला, “प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला तेवढे पुरे आहे.” येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू ठेवत नाहीस का? जे काही मी तुम्हांला सांगतो, ते मी स्वतःचे सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षाही मोठी कृत्ये करील, कारण मी पित्याकडे जात आहे. तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल, ते पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून मी करीन. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल, ते मी करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, हेतू हा की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील. मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे परत येईन. आता थोडा वेळ आहे. मग ह्यापुढे जग मला पाहणार नाही. तुम्ही मात्र मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी माझ्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आहात व मी तुमच्यामध्ये आहे. ज्याने माझ्या आज्ञा स्वीकारल्या आहेत व जो त्या पाळतो, तो माझ्यावर प्रीती करतो आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याच्यासमोर प्रकट होईन.” यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, आपण स्वतः आमच्यासमोर प्रकट व्हाल आणि जगासमोर प्रकट होणार नाही हे कसे?” येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील व आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वसती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल. मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. मी आता जातो आणि तुमच्याकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर मी पित्याकडे जात आहे, ह्याचा तुम्हांला आनंद होईल, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा सत्ताधीश येत आहे. पण त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही. परंतु जगाने हे ओळखावे की, मी पित्यावर प्रीती करतो, म्हणून पिता जशी मला आज्ञा देतो, तसे मी करतो. उठा, आपण येथून निघू या.”