योहान 12:20-32
योहान 12:20-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील. आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे. हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
योहान 12:20-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते, ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.” तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले. येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो. जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल. जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील. “आता माझा जीव अस्वस्थ झाला आहे, मी काय म्हणू? ‘हे पित्या, या घटकेपासून मला वाचव?’ नाही, केवळ याच कारणासाठी मी या घटकेस आलो आहे. हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!” नंतर स्वर्गातून वाणी आली, “मी ते गौरविले आहे आणि पुनः गौरवेन.” जो लोकसमुदाय तिथे उभा असून ऐकत होता तो म्हणाला, ही गर्जना झाली; इतर म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. तेव्हा येशू म्हणाले, “ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती. आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल. आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.”
योहान 12:20-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील. आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
योहान 12:20-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सणात उपासना करायला आलेल्या लोकांपैकी काही ग्रीक होते. त्यांनी गालीलमधील बेथसैदा येथील फिलिप ह्याच्याजवळ येऊन विनंती केली, “महाशय, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” फिलिपने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रेम करतो, तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो, तो त्याला शाश्वत जीवनासाठी राखील. जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील. आता माझा जीव व्याकूळ झाला आहे. मी काय बोलू? हे पित्या, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, असे म्हणू काय? परंतु या घटकेला सामोरे जाण्यासाठीच तर मी आलो आहे. हे पित्या, तू स्वतःच्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली, “मी त्याचा गौरव केला आहे आणि पुन्हाही करीन.” तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” परंतु येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी झाली आहे. आता ह्या जगाचा न्याय होत आहे. आता ह्या जगाचा सत्ताधीश बाहेर फेकला जाईल. मला पृथ्वीपासून उंच केले, तर मी सर्वांना माझ्याकडे ओढून घेईन.”