YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:20-44

योहान 11:20-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरीया घरांतच बसून राहिली. तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्यास म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.” आणि एवढे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला एकीकडे बोलवून म्हटले, “गुरूजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहे.” मरियेने हे ऐकताच, ती लवकर उठून त्याच्याकडे गेली. आता, येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्यास जेथे भेटली त्याच ठिकाणी होता. तेव्हा जे यहूदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरीया घाईघाईने उठून बाहेर जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले. मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.” जेव्हा, येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूदी लोकांस रडतांना पाहून तो आत्म्यात कळवळला व अस्वस्थ झाला; आणि म्हणाला, “तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?” ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. यावरुन यहूदी लोक म्हणाले, “पाहा, याची त्याच्यावर कितीतरी प्रीती होती!” परंतु त्यांच्यांतील कित्येक म्हणाले, “ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्यास, हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय?” येशू पुन्हा अंतःकरणात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” तेव्हा त्यांनी धोंड काढली; आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:20-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली. “प्रभुजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते तो आपणास देईल, हे मला ठाऊक आहे.” त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.” येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?” “होय,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसीहा), परमेश्वराचा पुत्र आपण आहात, यावर माझा विश्वास आहे.” ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीया हिला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.” मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जेथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते, व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले. येशू जेथे होते तेथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून, ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभुजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.” येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकुळ व अस्वस्थ झाले. येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभुजी, या आणि पाहा.” येशू रडले. नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!” परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाही का?” येशू, पुन्हा व्याकुळ होऊन, कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” “परंतु प्रभुजी,” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तेथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.” तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?” यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की, तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:20-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता; तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?” ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.” असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले. मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!” परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?” येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.” असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:20-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू येत आहे, हे ऐकताच मार्था बाहेर जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता. परंतु आतादेखील जे काही आपण देवाकडून मागाल, ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही, असा तुझा विश्‍वास आहे का?” ती त्याला म्हणाली, “हो प्रभो, माझा विश्‍वास आहे की, जो जगात येणारा देवाचा पुत्र आहे तो ख्रिस्त तुम्ही आहात.” असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती लगेच उठून त्याच्याकडे गेली. येशू अजून गावात आला नव्हता पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता. जे लोक मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले आणि ती शोक करायला कबरीकडे जात आहे, असे समजून ते तिच्या मागे गेले. येशू होता तेथे मरिया गेली आणि त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ आम्हांला सोडून गेला नसता.” येशूने तिला व तिच्याबरोबर आलेल्या लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात कळवळला व व्याकूळ होऊन म्हणाला, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, येऊन पाहा.” येशू रडला. हे पाहून लोक म्हणाले, “पाहा, ह्याची त्याच्यावर किती प्रीती होती!” परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळता आले नसते काय?” येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती. येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.” येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?” हे ऐकून त्यांनी शिळा बाजूला सारली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांचा तू मला पाठवले आहेस ह्यावर विश्वास बसावा, म्हणून मी हे बोललो.” असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!” तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”

सामायिक करा
योहान 11 वाचा