YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:1-31

योहान 11:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. तिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती हीच मरीया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता. म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, “प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.” पण ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्यायोगे गौरव व्हावे.” आता मरीया व तिची बहीण मार्था आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला. मग त्यानंतर, त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीया प्रांतात जाऊ या.” शिष्य त्यास म्हणाले, “रब्बी, यहूदी लोक आपल्याला आताच दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिकडे जाता काय?” येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो; पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेच लागते कारण त्याच्याठायी उजेड नाही.” येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो.” म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल.” आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता. झोपेतून मिळण्याऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. मग येशूने उघडपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे. आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ या.” मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, “आपणही याच्याबरोबर मरावयास जाऊ या.” मग येशू आला तेव्हा त्यास कळले की, त्यास कबरेत ठेऊन चार दिवस झाले आहेत. आता बेथानी नगर यरूशलेम शहरापासून सुमारे तीन किलोमीटर होते. आणि यहूदी लोकांपैकी पुष्कळजण मार्था व मरीया यांच्याकडे त्यांच्या भावाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास आले होते. म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरीया घरांतच बसून राहिली. तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्यास म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.” आणि एवढे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला एकीकडे बोलवून म्हटले, “गुरूजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहे.” मरियेने हे ऐकताच, ती लवकर उठून त्याच्याकडे गेली. आता, येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्यास जेथे भेटली त्याच ठिकाणी होता. तेव्हा जे यहूदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरीया घाईघाईने उठून बाहेर जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:1-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावाचा होता. ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभुच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते. तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.” येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.” मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तेथेच अधिक दोन दिवस राहिले. यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.” परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तेथे जाता काय?” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.” असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.” त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभुजी तो झोपला असेल, तर बरा होईल.” येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत. मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “लाजर मरण पावला आहे, तुमच्यासाठी मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.” परंतु दिदुम म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.” ते तेथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते. बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते. आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली. “प्रभुजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते तो आपणास देईल, हे मला ठाऊक आहे.” त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.” येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?” “होय,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसीहा), परमेश्वराचा पुत्र आपण आहात, यावर माझा विश्वास आहे.” ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीया हिला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.” मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जेथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते, व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. म्हणून, तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?” येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.” ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.” तेव्हा दिदुम1 म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, “आपणही ह्याच्याबरोबर मरायला जाऊ.” येशू आला तेव्हा त्याला कळले की, त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता; तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?” ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.” असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:1-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बेथानी ह्या गावी लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे हे गाव होते. हा आजारी पडलेला लाजर ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेलाचा अभिषेक केला होता व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.” शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, तेथील लोक अलीकडेच तुमच्यावर दगडमार करू पहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाणार का?” येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो. परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.” शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.” तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.” तेव्हा ज्याला दिदुम म्हणजे जुऴा म्हणत तो थोमा आपल्या जोडीदार शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ!” येशू बेथानीला आला तेव्हा त्याला कळले की, लाजरला कबरीत ठेवून चार दिवस झाले होते. बेथानी यरूशलेमपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते आणि पुष्कळ यहुदी लोक मार्था व मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यासाठी तेथे आले होते. येशू येत आहे, हे ऐकताच मार्था बाहेर जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता. परंतु आतादेखील जे काही आपण देवाकडून मागाल, ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही, असा तुझा विश्‍वास आहे का?” ती त्याला म्हणाली, “हो प्रभो, माझा विश्‍वास आहे की, जो जगात येणारा देवाचा पुत्र आहे तो ख्रिस्त तुम्ही आहात.” असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती लगेच उठून त्याच्याकडे गेली. येशू अजून गावात आला नव्हता पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता. जे लोक मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले आणि ती शोक करायला कबरीकडे जात आहे, असे समजून ते तिच्या मागे गेले.

सामायिक करा
योहान 11 वाचा