योहान 10:22-42
योहान 10:22-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता. आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता. म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?” यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय? मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून घ्यावे.” ते त्यास पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला. तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे आहे, तरी योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
योहान 10:22-42 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता. आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलमोनाच्या अंगणामध्ये फिरत होते. यहूदी पुढार्यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.” येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात, परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि माझा पिता एक आहोत.” तेव्हा यहूदी विरोधकांनी त्याला दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले, परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?” ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही ‘परमेश्वर’ आहा असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमात लिहिले नाही काय? ज्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने ‘परमेश्वर’ म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका; तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर मी करत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. म्हणजे तुमची खात्री होईल की पिता मजमध्ये आहे, व मी पित्यामध्ये आहे.” त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले. मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जेथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्याठिकाणी जाऊन राहिले. आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.” तेव्हा त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला.
योहान 10:22-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता; आणि येशू मंदिरामधील शलमोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही; जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.” येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?” ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही - तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.” ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
योहान 10:22-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते हिवाळ्याचे दिवस होते व यरुशलेममध्ये मंदिरसमर्पणाचा सोहळा साजरा केला जात होता. मंदिरात शलमोनच्या देवडीत येशू फिरत होता. लोकांनी त्याला घेरले व विचारले, “तुम्ही कुठपर्यंत आम्हांला संभ्रमात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल, तर आम्हांला उघडपणे सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो, ती माझ्याविषयी साक्ष देतात. मात्र तुम्ही विश्वास ठेवणार नाही कारण मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना शाश्वत जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकावून घेणार नाही. माझ्या पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातांतून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहुदी लोकांनी त्याला मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यांकरता तुम्ही मला दगड मारत आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.” येशूने त्यांना म्हटले, ““तुम्ही देव आहात, असे मी म्हणतो’, हे तुमच्या धर्मशास्त्रात लिहिले नाही काय? आणि ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि धर्मशास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यासाठी निवडून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटले म्हणून तुम्ही दुर्भाषण करता असे म्हणता काय? मी पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका. परंतु जर मी ती करतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी निदान त्या कृत्यांवर विश्वास ठेवा. या मागचा हेतू हा की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून व समजून घ्यावे.” ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले परंतु तो त्यांच्या हातांतून सुटला. तो पुन्हा यार्देन नदीच्या पलीकडे, योहान सुरुवातीला बाप्तिस्मा देत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले व ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, परंतु योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” तेथे अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.