योहान 1:9-14
योहान 1:9-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
योहान 1:9-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. ते त्यांच्या स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला. शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व जो अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता त्यांचे होते.
योहान 1:9-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.
योहान 1:9-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.