योहान 1:6-32
योहान 1:6-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे.” त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे. आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरूशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?” त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्यास विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात का?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.” यावरुन ते त्यास म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.” आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती. आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलीया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?” योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखित नाही असा एकजण तुम्हामध्ये उभा आहे. तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वहाणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या. दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे. मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.” योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
योहान 1:6-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. ते त्यांच्या स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला. शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व जो अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता त्यांचे होते. योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जे माझ्यानंतर येणार आहे, ते माझ्यापेक्षा थोर आहे कारण जे माझ्या अगोदर होते, ते हेच आहेत.’ ” त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे. कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे. परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे. जेव्हा यहूदी पुढार्यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय. तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.” त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीया आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” “मग आपण संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.” यशया संदेष्टा याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणारी वाणी आहे, ती म्हणते, “ ‘प्रभुचे मार्ग सरळ करा.’ ” आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते, त्यांनी प्रश्न विचारला की, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीया नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?” तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही. तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.” हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जेथे योहान बाप्तिस्मा देत होता. दुसर्या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा! ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, ते माझ्यापेक्षा थोर आहे कारण ते माझ्यापूर्वी होता.’ मला स्वतः त्यांची ओळख नव्हती, पण मी याच कारणासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो की त्यांनी इस्राएल लोकांस प्रकट व्हावे.” मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला.
योहान 1:6-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो : “‘जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता,’ असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे.” त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही; “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्यावर त्याने “नाही” असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्याची वाणी’ मी आहे.” ती पाठवलेली माणसे परूश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता?” योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमच्यामध्ये उभा आहे; जो माझ्यामागून येणारा आहे, [तो माझ्यापूर्वी होता,] त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.” यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसर्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे, कारण ‘तो माझ्यापूर्वी होता’ असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.” आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
योहान 1:6-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाने एक मनुष्य पाठवला. त्याचे नाव योहान असे होते. तो साक्षीकरता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते. त्याच्याविषयी योहानने साक्ष दिली आणि आवेशाने म्हटले, “‘जो माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पुढचा आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हा आहे.” त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे. यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, तर स्पष्ट म्हटले, “मी ख्रिस्त नाही.” त्यांनी त्याला विचारले, “मग कोण? आपण एलिया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो संदेष्टा आपण आहात काय?” त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही.” तेव्हा ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे आम्हांला सांगा. आपले स्वतःविषयी काय म्हणणे आहे?” त्याने उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे “परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.” ही माणसे परुशी लोकांनी पाठवली होती. त्यांनी त्यानंतर योहानला विचारले, “आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत व संदेष्टाही नाहीत, तर मग आपण बाप्तिस्मा का देता?” योहानने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा देतो. परंतु ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुमच्यात उभा आहे. तो माझ्यानंतर येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.” यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे योहान बाप्तिस्मा देत होता. तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू! “जो माझ्यानंतर येत आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हा आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएली लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो आहे.” योहानने अशी साक्ष दिली, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.