योहान 1:35-51
योहान 1:35-51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर दुसर्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता; येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!” त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधीता?” ते त्यास म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?” तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्यादिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे चार वाजले होते. योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.” त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.” दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, “माझ्यामागे ये.” आता, फिलिप्प बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र यांच्या नगराचा होता. फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे.” नथनेल त्यास म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलीप्पाने त्यास म्हणाला, “येऊन पाहा.” नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.” नथनेल त्यास म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली?” येशूने त्यास उत्तर दिले, “तुला फिल्लीपाने बोलावले त्यापुर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले.” नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.” येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.” आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.”
योहान 1:35-51 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुसर्या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा असताना, येशूंना जाताना पाहून, योहानाने म्हटले, “हा पाहा, परमेश्वराचा कोकरा!” त्या दोन शिष्यांनी त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा ते येशूंना अनुसरले. येशूंनी मागे वळून ते आपल्याला अनुसरत आहेत हे पाहून विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?” त्यांनी उत्तर दिले, “रब्बी” म्हणजे “गुरुजी, आपण कोठे राहता?” येशूंनी म्हटले, “या आणि पाहा.” त्यांनी जाऊन त्यांचे निवासस्थान पाहिले आणि तो संपूर्ण दिवस त्यांनी त्यांच्याबरोबर घालविला. त्यावेळी दुपारचे चार वाजले होते. योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता. आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.” मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला. येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र. दुसर्या दिवशी येशूंनी गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. त्यांना फिलिप्प सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” फिलिप्प हा आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच बेथसैदा नगरचा रहिवासी होता. मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.” त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तेथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.” आपल्याकडे नाथानाएल येताना पाहून, येशू म्हणाले, “हा खरा इस्राएली असून याच्यामध्ये फसवणूक आढळत नाही.” तेव्हा नाथानाएलाने विचारले, “तुम्ही मला कसे ओळखता?” येशूंनी त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली उभे असताना पाहिले होते.” नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.” त्यावर येशू म्हणाले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस. परंतु यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी तू पाहशील.” ते पुढे असेही म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की तुम्ही स्वर्ग उघडलेला आणि परमेश्वराचे स्वर्गदूत वर चढताना व मानवपुत्रावर उतरताना पाहाल.”
योहान 1:35-51 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यानंतर दुसर्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता, येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!” त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?” तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे.” त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.” दुसर्या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, “माझ्या-मागून ये.” फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथला होता. फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आम्हांला सापडला आहे.” नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप्प त्याला म्हणाला, “येऊन पाहा.” नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!” नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले.” नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.” आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”
योहान 1:35-51 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा होता आणि येशूला बाजूने चालत जाताना पाहून तो म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!” त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेले. येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी (म्हणजे गुरुवर्य), आपण कोठे राहता?” तो त्यांना म्हणाला, “या आणि पाहा.” ती दुपारची वेळ होती. त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या बरोबर राहिले. योहानचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याने त्याचा भाऊ शिमोन ह्याची लगेच भेट घेतली आणि त्याला सांगितले, “आम्हांला मसिहा (म्हणजे ख्रिस्त) भेटला आहे.” नंतर अंद्रियाने शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहत म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस, परंतु तुला केफा म्हणजेच पेत्र म्हणतील.” दुसऱ्या दिवशी येशूने गालीलमध्ये जायचे ठरवले तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” फिलिप हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथील होता. फिलिपला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात व संदेष्ट्यांनीसुद्धा लिहिले आहे, तो म्हणजे योसेफचा मुलगा, नासरेथकर येशू आम्हांला भेटला आहे.” नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी चांगले निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “ये आणि पाहा.” नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!” नथनेलने येशूला विचारले, “आपण मला कसे काय ओळखता?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले.” नथनेल त्याला म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले, असे सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा महान गोष्टी तू पाहशील.” आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”