याकोब 5:15-18
याकोब 5:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.
याकोब 5:15-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल. यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते. एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.
याकोब 5:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर2 पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले.
याकोब 5:15-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल. तर मग तुम्ही आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलीया आपल्यासारखा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी जिवेभावे प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले.