यशया 8:1-10
यशया 8:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज असे लिही.” माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.” परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला, “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात. म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील. आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल. योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे.
यशया 8:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.” उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.” मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.” परमेश्वराने मला पुन्हा म्हटले, “हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात; ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील; त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1