YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 7:1-17

यशया 7:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही. दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली. मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा. त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको. अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात, आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु. प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही, कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.” परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला, “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय? म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल. तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील. कारण त्या मुलाला वाईट नाकारून व चांगले ते पसंत करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजांची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल. एफ्राईम यहूदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलाच्या घराण्यावर आणील; तो अश्शूरच्या राजाला तुजविरूद्ध आणील.”

सामायिक करा
यशया 7 वाचा

यशया 7:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली. तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे. आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको. अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे, “चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.” तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही, कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ” पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले, “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.” परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.” तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का? म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल, कारण त्या मुलाला अयोग्य नाकारणे आणि योग्य निवडणे हे पुरेसे माहीत होण्याआधीच, ज्या दोन देशाच्या राजांची तुम्हाला भीती वाटत आहे ते नष्ट केले जातील. एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”

सामायिक करा
यशया 7 वाचा

यशया 7:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. ‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली. तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा; आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्‍या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस. अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र ह्यांनी तुझ्याविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, आपण यहूदावर चालून जाऊन त्यांना धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही. अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.) एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’ परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला : “तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.” आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय? ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल. एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील; म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझ्यावर आणील.”

सामायिक करा
यशया 7 वाचा