यशया 64:1-9
यशया 64:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील, जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते! जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे, ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही. जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे, पण तू रागावलास आणि आम्ही पाप केले. त्या मध्ये आमचे तारण होईल का? कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे. तुझ्या नावाला हाक मारेल असा कोणी नाही आहे, आणि तुला धरून घ्यायला कोणी प्रयत्न करीत नाही. कराण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हांस आमच्या पातकांच्या हाती सोपवून दिले आहे. पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो. परमेश्वरा, आमच्यावर सतत रागावू नकोस आणि आमची पातके कायमची लक्षात ठेवू नकोस. जे आम्ही तुझे लोक आहोत, कृपया आम्हा सर्वांकडे लक्ष दे.
यशया 64:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते! जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील! जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले. प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, कोणत्याही कानावर ते पडले नाही, कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात. जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता. परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो, तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला. आता आमचा उद्धार कसा होणार? आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात. तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे. परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत. हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका; आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका. हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा, कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत.
यशया 64:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते! अग्नी जसा काड्याकुड्या जाळतो व पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंना आपले नाम प्रकट करण्यासाठी उतरला असतास; तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते! हे देवा, तुझी आशा धरून राहणार्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. जो आवडीने नीती आचरतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात, त्यांना तू भेट देतोस; पाहा, तू आमच्यावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो; ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत; तर आमचा उद्धार होईल काय? आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस. तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. हे परमेश्वरा, फार कोपू नकोस, आमचा अधर्म सदा स्मरू नकोस, पाहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवतो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहोत!