YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 58:1-12

यशया 58:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव. तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो. अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला. ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते. ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.” पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही. या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी? आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल? “या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय? भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.” तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल. तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल. तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे. जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील. जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली, तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल. तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील, आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल. तुझ्यापैकी काही प्राचीन अवशेषांची पुनःबांधणी करतील; तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या उभारशील. तुला “भींती दुरुस्त करणारा आणि राहण्यासाठी रस्ते नीट करणारा असे म्हणतील.”

सामायिक करा
यशया 58 वाचा

यशया 58:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर. ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्‍या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्‍या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात. ‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता. पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील; जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील, बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.

सामायिक करा
यशया 58 वाचा