यशया 44:24-28
यशया 44:24-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्वकाही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे. व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो. मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा, जो यरूशलेमेविषयी म्हणतो की, ती वसविली जाईल आणि यहूदाच्या नगराविषयी म्हणतो की, ती पुन्हा बांधली जातील आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन. जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन. जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.
यशया 44:24-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली, खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो. जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’ जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा, आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’ कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’
यशया 44:24-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते? खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’ मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’ मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’