YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 44:1-8 - Compare All Versions

यशया 44:1-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक. ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका, आणि यशुरुना, ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिऊ नको. कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील. मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन. पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळुंज, तसे ते गवतामध्ये उगवते. “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव आपणास ठेवील; आणि दुसरा आपल्या हातावर परमेश्वरासाठी असे लिहील आणि त्यास इस्राएलाच्या नावाने बोलावतील.” इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे; आणि माझ्याशिवाय कोणी देव नाही. माझ्यासारखा कोण आहे? तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे माझे पुरातन लोक स्थापले तेव्हापासून ज्या गोष्टी घडत आहेत व पुढे ज्या घडतील त्या त्यांनी कळवाव्या. तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय? तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तेथे कोणी देव आहे काय? तेथे कोणी दुसरा ‘खडक’ नाही; मला कोणी माहीत नाही.”

सामायिक करा
यशया 44 IRVMAR

यशया 44:1-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“परंतु आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक, याहवेह असे म्हणतात— ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले, आणि जे तुला साहाय्य करतील: याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, हे यशुरून, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको. कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन, आणि शुष्क जमिनीला झरे देईन; तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन. कुरणातील गवतासारखे ते उगवतील वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील. काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’; तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील; आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही. माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे. भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”

सामायिक करा
यशया 44 MRCV

यशया 44:1-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक; परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळुंज उगवते, तसे ते गवतामध्ये उगवतील. तेव्हा कोणी म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे;’ कोणी याकोबाचे नाव घेईल; कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा, असे लिहील आणि इस्राएल हे उपनाव घेईल.” इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.”

सामायिक करा
यशया 44 MARVBSI