यशया 32:1-8
यशया 32:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. वार्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तेव्हा पाहणार्यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्यांचे कान ऐकतील. उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल. मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत. भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते. ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो. पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.
यशया 32:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, राजा सदाचाराने राज्य करील, आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. प्रत्येक जण जसा वाऱ्यापासून आडोसा व वादळामध्ये आश्रय व पाऊस तसा होईल, सुक्या भूमीत जसे पाण्याचे प्रवाह, उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा तो होईल. तेव्हा जे हे पाहतील त्यांचे डोळे मंदावणार नाही आणि ऐकणाऱ्यांचे कान हे लक्षपूर्वक ऐकतील. अविचारी बारकाईने समजून घेईल, तोतरा सहजतेने व स्पष्ट बोलेल. मूर्खाला अधिक काळ सन्मान्य म्हणणार नाही, किंवा फसविणाऱ्यास प्रतिष्ठीत. म्हणणार नाहीत. कारण मूर्ख मनुष्य आपल्या मनात मूर्खपणाच्या गोष्टी बोलतो आणि वाईट गोष्टींचे बेत आखतो आणि तो दुष्कृत्ये आणि देवविरहीत चुकीच्याच गोष्टी परमेश्वराविरूद्ध बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही आणि तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही. फसवणाऱ्याच्या पद्धती वाईट असतात. तो दुष्ट योजना आखून गरीब योग्य ते बोलतो तेव्हाही तो असत्याने गरीबाचा नाश करू पाहतो. परंतु सन्माननीय मनुष्य सन्माननीय योजना करतो कारण त्याच्या सन्माननीय कृतीमुळेच तो उभा राहतो.
यशया 32:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील. प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल. तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील. भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल. यापुढे मूर्खांना चांगले व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही. मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात. बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, गरजवंताची याचना वाजवी असली तरी, ते दुष्टाईच्या योजना बनवितात, ते लबाडीने गरिबांचा नाश करतात. परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.