YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 30:1-15

यशया 30:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात; ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात! म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल. त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत. तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वांना लज्जा प्राप्त होईल, त्यांपासून त्यांना काही लाभ व्हायचा नाही, त्यांपासून त्यांना साहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील.” दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात. मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो. तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील. कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत. ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा; मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.” ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता; म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल; कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.” कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.

सामायिक करा
यशया 30 वाचा

यशया 30:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात. ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात. यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल. तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत. कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.” नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले. आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील. कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात. ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग. मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.” यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो, “कारण तुम्ही हा संदेश नाकारता आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता. म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल. कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.” कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.

सामायिक करा
यशया 30 वाचा