इब्री 2:10-18
इब्री 2:10-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत, ह्या कारणास्तव त्यांना ‘बंधू’ म्हणायची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, “मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन.” आणि पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच, “पाहा, मी व देवाने मला दिलेली मुले.” ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.’1 म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.
इब्री 2:10-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले. जो लोकांस पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही. तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन. तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत. म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
इब्री 2:10-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या दुःख सहनाद्वारे जो त्यांच्या तारणाचा उत्पादक त्यांना परिपूर्ण करावे. जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही. ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बांधवांजवळ; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करीन.” आणि पुन्हा, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी येथे आहे, आणि परमेश्वराने मला दिलेली मुलेही आहेत.” आणि ज्याअर्थी लेकरांना रक्त आणि मांस आहे, त्याअर्थी तेही रक्तमांसाचा भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे ज्या सैतानाजवळ मृत्यूचे सामर्थ्य होते, त्याचे सामर्थ्य मोडून काढावे. मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दासत्वाच्या गुलामगिरीत राहणार्यांची त्यांना सुटका करता येईल. हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात. या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधुसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले. कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपली परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.
इब्री 2:10-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्याने सर्व काही निर्माण केले व जो सर्व काही अस्तित्वात टिकवून ठेवतो त्या परमेश्वराने पुष्कळ पुत्रांना त्याच्या वैभवात सहभागी करून घेताना त्यांच्या तारणाचा अग्रेसर येशूला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण केले, हे देवाच्या दृष्टीने उचितच झाले. जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकाच पित्यापासून आहेत, ह्या कारणामुळे त्यांना बंधू म्हणावयाची येशूला लाज वाटत नाही. तो परमेश्वराला म्हणतो, मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन, त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन. तसेच तो पुढे म्हणतो, पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह मी येथे हजर आहे. ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी विश्वसनीय व दयाळू प्रमुख याजक व्हावे. ज्याअर्थी त्याने स्वतः कसोटीशी सामना करताना दुःख भोगले, त्याअर्थी ज्यांची कसोटी होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.