इब्री 12:1-11
इब्री 12:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे. तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा. तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो. हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे? आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हास आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे. कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
इब्री 12:1-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि ते परमेश्वराच्या राजासनाच्या उजवीकडे बसले आहे. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमचे मनांचे धीर सुटणार नाही. पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही. आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाला, “माझ्या पुत्रा, प्रभुच्या शिस्तीचा अनादर करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस, कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, आणि ज्या प्रत्येकाला मूल म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.” तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात, आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस त्यांनी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
इब्री 12:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस; कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते; पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.
इब्री 12:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे. आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही; तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिस्तीचा अनादर करू नकोस किंवा त्याच्याकडून तुला शिक्षा होत असता खचू नकोस कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो पुत्र म्हणून स्वीकारतो त्या प्रत्येकाला शिक्षा करतो. शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे? जी शिक्षा सर्वांना मिळालेली आहे ती शिक्षा स्वीकारावयास तुम्ही जर तयार नसाल, तर तुम्ही खरे पुत्र नव्हे, तर अनौरस संतती आहात. शिवाय शिक्षा करणाऱ्या आपल्या मानवी पित्याचा आपण आदर राखतो, तर मग आपण जो आत्म्याचा पिता आहे, त्याच्या अधिक प्रमाणात अधीन होऊन जिवंत राहू नये काय? आपला मानवी पिता त्याला योग्य वाटेल तशी थोडे दिवस शिक्षा करत होता; पण देव जी शिक्षा करतो, ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा त्यावेळी खेदाची वाटते, आनंदाची वाटत नाही; परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.