YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:5-31

इब्री 11:5-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’ आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’ परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्‍यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्‍यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली. हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. ‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता; त्याला असे सांगितले होते की, “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” तेव्हा मेलेल्यांतूनदेखील उठवण्यास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्‍या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’ योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. ‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्‍या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्‍यांबरोबर तिचा नाश झाला नाही.

सामायिक करा
इब्री 11 वाचा

इब्री 11:5-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे. विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला. विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला. विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यात वस्ती होती. कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता. विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले. म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्‍यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली. हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात. आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे. अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला. त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’ तरी, देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून, जणू लाक्षणिक अर्थाने, परतही मिळाला. इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्‍या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली. विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्‍याने त्यांना शिवू नये. विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले. विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले. विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.

सामायिक करा
इब्री 11 वाचा

इब्री 11:5-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.” हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाला होता की तो हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होता. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध करणार्‍यांना ते प्रतिफळ देतात. विश्वासाद्वारे नोहाने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोहाने विश्वासामुळेच जगाचा न्याय केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले. जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कोठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तेथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले. विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व घडविलेल्या अशा पाया बांधलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता. विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करीलच हे तिला माहिती होते. आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला. ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते. त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवतात. त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते, पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे. परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्यांना वारसाचे वचन प्राप्त झाली होती तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला; जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाच्याद्वारे तुझ्या संततीची गणना होईल,” तरीदेखील. अब्राहामाने तर्क केला की इसहाक मरण पावला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करतील; आणि तसे म्हणावे तर त्याला इसहाक मरणातून पुन्हा जिवंत मिळाला. विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला. याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असताना, उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व योसेफाच्या दोन्ही मुलांना विश्वासाने प्रार्थना करून आशीर्वाद दिला. जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली! विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारो राजाचा नातू म्हणवून घेण्‍यास नाकारले, व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले. इजिप्त देशामधील सार्‍या भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. तो पुढे पुढे चालतच राहिला; प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याबरोबर आहे, असे त्याला दिसत होते. म्हणूनच त्यांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या जेष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे. इस्राएली लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि कोरड्या जमिनीवरून चालत जावे तसे ते तांबड्या समुद्रातून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते सर्व बुडून मेले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली. विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही.

सामायिक करा
इब्री 11 वाचा

इब्री 11:5-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे; विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे; देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास बाळगला पाहिजे की, देव आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो पारितोषिक देणारा आहे. जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली व तिच्याप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वतनदार झाला. अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती; कारण दृढ पाया असलेल्या, देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची अब्राहाम वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही त्याला बाप होण्याची क्षमता मिळाली व सारालादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण त्याने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली. हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले. असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती; पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगत होते; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता; परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’; तेव्हा मेलेल्यांतून उठवावयासदेखील देव समर्थ आहे, हे अब्राहामने मानले आणि लाक्षणिक अर्थाने त्या स्थितीतून तो त्याला परत मिळाला. इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली. योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये. तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले. इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले. राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्‍वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.

सामायिक करा
इब्री 11 वाचा

इब्री 11:5-31

इब्री 11:5-31 MARVBSIइब्री 11:5-31 MARVBSIइब्री 11:5-31 MARVBSIइब्री 11:5-31 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा