YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 1:1-14

इब्री 1:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्या द्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’ ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे”? आणि पुन्हा, “मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल”? आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, “देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.” आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, “तो आपले देवदूत वायू, आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.” पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” आणि, “हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; तू त्यांना झग्यासारखे - वस्त्रासारखे गुंडाळशील, आणि ती बदलली जातील; परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.” पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, “मी तुझ्या वैर्‍यांना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस”? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?

सामायिक करा
इब्री 1 वाचा

इब्री 1:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला. तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’ आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.” देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.” पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.” आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे. ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील. तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत. तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?

सामायिक करा
इब्री 1 वाचा

इब्री 1:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलले आहे, त्यांनी त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे, आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे. पुत्र परमेश्वराच्या गौरवाचा प्रतिबिंब आणि त्याचे हुबेहूब प्रतिरूप आहे, ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गात थोर परमेश्वराच्या उजव्या हातास विराजमान झाले. अशा रीतीने ते देवदूतांच्या मानाने अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे. कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे”? आणि पुन्हा एकदा, “मी त्याचा पिता होईन, आणि तो माझा पुत्र होणार”? आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो, आणि म्हणतो, “परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.” परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात, “तो त्यांच्या दूतांना वायुसमान, आणि त्यांच्या सेवकांना अग्निज्वाला असे करतात.” पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात, “हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. नीतिमत्व तुम्हाला प्रिय व दुष्टाईचा तुम्हाला द्वेष आहे; म्हणून परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, तुम्हाला इतर सोबत्यांपेक्षा उच्च करून आनंदरूपी तेलाने अभिषिक्त केले आहे.” ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. ती नाहीतशी होऊन शून्यवत होतील, पण तुम्ही निरंतर राहणार; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील. तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. पण तुम्ही बदलणार नाहीस, आणि तुमची वर्षे संपणार नाहीत.” आणि परमेश्वराने कोणत्या आपल्या दूतांविषयी असे म्हटले, “जोपर्यंत तुझ्या शत्रूंना पायाखाली ठेवीपर्यंत तू येथे माझ्या उजव्या हाताला बसून राहा”? कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे जासूद म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत का?

सामायिक करा
इब्री 1 वाचा

इब्री 1:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला. परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले. तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे. पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे. कारण त्याने त्याच्या कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल. परंतु तो प्रथम जन्मलेल्या पुत्राला जगात आणताना म्हणतो: देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. मात्र देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वारे आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करतो. परंतु पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगांचे आहे आणि तुझा राजदंड न्यायाचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि वाइटाचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ अशा आनंददायक तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तो असेही म्हणाला, हे प्रभो, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील; तू त्यांस झग्यासारखे गुंडाळशील आणि ती कपड्यांप्रमाणे बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. देवाने त्याच्या कोणत्याही देवदूताविषयी कधी असे म्हटले? मी तुझ्या वैऱ्यांना तुझ्या पायांखाली ठेवेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय?

सामायिक करा
इब्री 1 वाचा