उत्पत्ती 8:1-16
उत्पत्ती 8:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली. पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले. चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले. तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही. असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता. दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती. देव नोहाला म्हणाला, “तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.
उत्पत्ती 8:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले; जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले. ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली, आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले. सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही. सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले. दुसर्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाळली. मग देव नोहाला म्हणाला, “तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ.