YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 7:1-21

उत्पत्ती 7:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी सातसात नरमाद्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन-दोन नरमाद्या, आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.” तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्या वेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला. शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून नर व मादी अशी जोडीजोडीने, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. ह्याच दिवशी नोहा, आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, आणि त्यांच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुना हे तारवात गेले. हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक जोडी नोहाकडे तारवात गेली. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक नरमादी आत गेली; मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले. पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशू, वनपशू, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले

सामायिक करा
उत्पत्ती 7 वाचा

उत्पत्ती 7:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस. प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे. आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील. आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले. जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले. पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही, देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले. मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली. नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या. पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता. त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेथ आणि नोहाची पत्नी व त्यांच्या बरोबर त्याच्या मुलांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी, यांनी तारवात प्रवेश केला. ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला. देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले. मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले. मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले. पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले; पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले. पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आणि सर्व मानवजात मरून गेले.

सामायिक करा
उत्पत्ती 7 वाचा

उत्पत्ती 7:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. तुझ्याबरोबर शुद्ध अशा प्राण्यांच्या प्रत्येक जातीच्या नर व मादी अशा सात जोड्या आणि अशुद्ध प्राण्यांच्या प्रत्येक जातीची नर व मादी अशी एकच जोडी ने, आणि प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या नरमादीच्या सात जोड्या, म्हणजे पृथ्वीवर त्यांचे विविध प्रकार जिवंत राहतील. आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.” याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले. जलप्रलय आला, तेव्हा नोआह सहाशे वर्षांचा होता. जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला. तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले. आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला. नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली. आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला. त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले. त्यांच्याबरोबर प्रत्येक वन्यजातीचे प्राणी, सर्वप्रकारचे पाळीव पशू, जमिनीवर सरपटणारे प्राणी आणि प्रत्येक जातीचे, पंख असलेले सर्व पक्षी तारवात गेले. ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकएक जोडी नोआहकडे आली आणि त्यांनी नोआहसोबत तारूत प्रवेश केला. नर व मादी असे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जोडीजोडीने आले. मग याहवेहने त्यांना आत ठेवून तारवाचे दार बंद केले. जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले. पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले. पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता.

सामायिक करा
उत्पत्ती 7 वाचा