उत्पत्ती 7:1-10
उत्पत्ती 7:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस. प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे. आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील. आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले. जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले. पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही, देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले. मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.
उत्पत्ती 7:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. तुझ्याबरोबर शुद्ध अशा प्राण्यांच्या प्रत्येक जातीच्या नर व मादी अशा सात जोड्या आणि अशुद्ध प्राण्यांच्या प्रत्येक जातीची नर व मादी अशी एकच जोडी ने, आणि प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या नरमादीच्या सात जोड्या, म्हणजे पृथ्वीवर त्यांचे विविध प्रकार जिवंत राहतील. आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.” याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले. जलप्रलय आला, तेव्हा नोआह सहाशे वर्षांचा होता. जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला. तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले. आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला.
उत्पत्ती 7:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी सातसात नरमाद्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन-दोन नरमाद्या, आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.” तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्या वेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला. शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून नर व मादी अशी जोडीजोडीने, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.