उत्पत्ती 6:9-22
उत्पत्ती 6:9-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते. देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती, आणि हिंसाचाराने भरलेली होती. देवाने पृथ्वी पाहिली; आणि पाहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. म्हणून देव नोहाला म्हणाला, “मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन.” तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे. तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर. आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहे ते मरण पावतील. मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी दोन-दोन तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने; ते नर व मादी असावेत. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.” नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्वकाही केले.
उत्पत्ती 6:9-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले. परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती. जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे. तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर. मी पृथ्वी महापुराने भरून टाकणार आहे आणि आकाशाखाली ज्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक सजीव प्राण्याचा मी नाश करणार आहे. पृथ्वीवर जे काही आहे त्याचा नाश होईल. परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील. तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये. प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.
उत्पत्ती 6:9-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे : त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी. तारवाला उजेडासाठी खिडकी कर; तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर; तारवाच्या एका बाजूला दार ठेव; त्याला खालचा; दुसरा व तिसरा असे मजले कर. पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल; तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.” नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.