उत्पत्ती 6:5-9
उत्पत्ती 6:5-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.” परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली. या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला
उत्पत्ती 6:5-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.” परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.