उत्पत्ती 50:15-21
उत्पत्ती 50:15-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली, तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय? तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.
उत्पत्ती 50:15-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.” त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी : तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.